ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’ या चित्रपटाची केवळ कथाच चांगली नव्हती तर त्यातील गाणी देखील चांगली होती. आज देखील ही गाणी ऐकायला लोकांना आवडतात. या सिनेमामध्ये अभिनेता सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका केली होती, त्या अभिनेत्रीचे नाव आठवतेय? सुंदर चेहरा आणि घाऱ्या डोळ्यांची ही सुंदर अभिनेत्री आता कुठे आहे ? काय करते ?
त्या अभिनेत्रीचं नाव आहे शरबानी मुखर्जी. गायक रूप कुमार राठोड यांच्या आवाजातील ‘तो चलूं’ हे गाणे सुनील शेट्टी आणि अभिनेत्री शरबानी मुखर्जीवर चित्रित झाले होते आणि या गाण्यामुळे शरबानी रातोरात स्टार बनली होती. या चित्रपटात तिची भूमिका लहान असूनही शरबानी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली होती.
मात्र हा चित्रपट सुपरहिट होऊन सुद्धा शरबानीला चांगल्या भूमिका, चांगले चित्रपट मिळाले नाहीत. त्यामुळे लहान भूमिका करत काही काळ शरबानीने आपली अभिनय कारकीर्द सुरू ठेवली होती. ‘बॉर्डर’ नंतर ‘मिट्टी’, ‘अंश’, ‘आंच’, ‘मोहनदास’ अशा काही सिनेमांमध्ये ती दिसली होती.
मात्र लवकरच तिच्या लक्षात आले की, या इंडस्ट्रीमध्ये तिला मोठे यश मिळणे अवघड आहे. त्यामुळे तिने मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु तिथेही ती यश मिळवू शकली नाही. त्यामुळे राणी मुखर्जी आणि काजोलची चुलत बहीण असलेल्या शरबानीने २०१५ मध्ये ग्लॅमरस चित्रपटसृष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. आता शर्बानी आपल्या कुटुंबासह कोलकत्याला राहते.